Wednesday, May 9, 2018

नेपाळ सफर - दिवस सहावा - पोखरा ते काठमांडू

शनिवार १४ एप्रिल २०१८

रोजच्याप्रमाणे सकाळी सहाच्या आधी उठलो.  आज पोखराहून काठमांडूकडे प्रयाण.  सातला बस सुटणार होती.  वेळेत आवरून रूम सोडून हॉटेलमधून निघालो.  चालत बस स्थानक गाठायला वीसेक मिनिटं लागली.

बस स्थानकात वीस पंचवीस बस लागलेल्या.  त्यांच्यातून माझी बस शोधून काढली.  मोठी बॅग बसच्या डिक्कीत दिली.  मला तिकीट देताना सर्वात शेवटच्या रांगेतली सीट दिली होती.  आता बसचा चालक मला पुढे केबिनमधे घ्यायला तयार झाला.

काठमांडूला जायच्या तयारीत
बसमधे चक्क फ्री वायफाय होते.  पासवर्ड केबिनच्या दारावर लिहिला होता.  मी काही त्यात पडलो नाही.  प्रवासातल्या पाच तासांची शांतता कशाला उगाचच भंग करायची.

बसमधे बहुतेक सर्व विदेशी पर्यटक होते.  पोखराला जाणाऱ्या आठ दहा बस बरोबरीने निघाल्या.  पोखरातून बाहेर पडण्याचा रस्ता सकाळच्या वेळी रिकामाच होता.  दूरवरून उंचच उंच बर्फाच्छादित पर्वतशिखरे खुणावत होती.  नुसते रस्त्यारस्त्यांवरून फिरू नका.  या कधीतरी इकडे जमेल तेव्हा.

पोखरा मधले रस्ते
पलीकडे उंचच उंच बर्फाच्छादित पर्वतशिखरे
एका स्टॉपला एक जाड बाई आणि त्यांचा आठेक वर्षांचा मुलगा बसमधे चढले आणि केबिनमधे आले.  आधीच आम्ही तीन जण होतो.  आता दाटीवाटीने कसेतरी बसलो.  ह्या बाई ड्रायव्हरच्या ओळखीच्या होत्या.  त्या बहुदा तिकीट न काढता आलेल्या होत्या.  म्हणून केबिनमधे बसल्या होत्या.  मी चालकाला पुढची एखादी सीट आहे का विचारले.  त्याने थोड्या वेळाने मला शेवटून दुसऱ्या रांगेतली सीट दिली.  शेवटच्या रांगेत एक चिनी माणूस बसला होता.  बाकी शेवटच्या दोन रांगा रिकाम्या होत्या.

साडेनऊला बस नाश्त्यासाठी एका चांगल्या जागी थांबली.  मी पुरी भाजी खाल्ली.  चहा कॉफीच्या भानगडीत पडलो नाही.

पोखराहून काठमांडूला जाताना ...
निसर्गरम्य परिसर
बस मधे जमेल तशी झोप पूर्ण केली.  दोन सीटच्या जागेत जमेल तसे पसरून झोपलो.

चारच्या सुमारास बस काठमांडूला पोहोचली.  बस थमेलच्या आसपास कुठेतरी थांबली होती.

पोखरा ते काठमांडू प्रवास, नंतर गुगल मॅप मधे पाहिलेला
  थमेल किती लांब आहे, कसे जायचे ह्याची चौकशी केली.  काठमांडूमधे थमेल ह्या ठिकाणी अनेक हॉटेल्स आहेत आणि हि जागा राहण्यासाठी योग्य आहे असे वाचले होते.  पण जड बॅगा घेऊन हॉटेल शोधणे नको होते.  हॉटेल फेवा दर्शन जवळच सापडले.  ह्यात रूम घेतली.  रूम स्वच्छ नव्हती.  पण आता दुसरे हॉटेल शोधात फिरणे नको होते.  आवरून जेवायला हॉटेलच्या गच्चीवर गेलो.  थुक्पा मागवले.  थुक्पा म्हणजे सूप आणि नूडल्स एकत्र.  ते बनवायला आणि द्यायला ह्यांनी पाऊण तास वेळ काढला.

हॉटेलच्या गच्चीतून दिसलेले काठमांडू
पोट भरल्यावर हॉटेलच्या बाहेर पडून परिसराची पाहणी सुरु.  उद्यासाठी दुसरं हॉटेल शोधणं भाग होतंच.  हॉटेलच्या समोरच एक ट्रॅव्हल एजन्टचं दुकान होतं.  ह्याच्याकडे काठमांडूहून काकरविटाला जायच्या बसची चौकशी केली.  ह्याचं म्हणणं इतक्या लांब बसनी कशाला जाता.  विमानाने जा.  हा पर्याय योग्य होता.  हॉटेलच्या रूम वर जाऊन पैसे घेऊन आलो.  काठमांडू ते भद्रपूर विमान तिकीट घेतले.  येति एरलाईन्सचं दुपारचं दोन वाजून पस्तीस मिनिटांचं फ्लाईट होतं.  पाच हजार दोनशे नेपाळी रुपये.  म्हणजे आपले तीन हजार दोनशे पस्तीस.

मग पुढचे तीन तास चहुबाजूंचे रस्ते धुंडाळले.  मला गल्लीबोळाचे रस्ते समजत नाहीत.  त्यामुळे मी एकच रस्ता पकडून लांबवर जाऊन येतो.  जाता येताना डाव्या उजव्या बाजूच्या रस्त्यांवर थोडं पुढंपर्यंत जातो.

एक चांगलं हॉटेल सापडलं.  तिबेट पीस इन्.  रिसेप्शन वरचा मुलगा मला दोन हजार नेपाळी रुपयात रूम द्यायला तयार झाला.  त्याला एक हजार नेपाळी रुपये ऍडव्हान्स दिला.  उद्याच्या राह्यचीही चांगली सोय झाली आणि काठमांडूहून बॉर्डर पर्यंत जायचीही.  आता उद्या निश्चिन्तपणे काठमांडू भ्रमंती.

थोडं पुढे गेल्यावर एक फुटसॉल कोर्ट दिसले.  मुलं खेळत होती.  तिथे थोडा वेळ थांबलो.

काठमांडू मधले फुटसॉल कोर्ट
आम्ही दर शनिवारी खेळतो त्या T29 एवढेच होते हे फुटसॉल कोर्ट.  हि मुलं शनिवारी संध्याकाळी एका तासाचे २२५० नेपाळी रुपये देऊन खेळत होती.  म्हणजे आपले चौदाशे.

ह्या रस्त्याला जेवण्यासाठी एक उत्तम ठिकाण सापडले.

थुक्पा म्हणजे सूप आणि नूडल्स एकत्र
चाऊमिन म्हणजे रस्सा नसलेल्या नूडल्स (आपल्याकडे आपण ज्याला नूडल्स म्हणतो त्या)
आणि मोमोंचे पंधरा प्रकार मी पहिल्यांदाच पाहिले
मेनू कार्डाचे फोटो काढले.  मेनू कार्ड मधल्या किमती नेपाळी रुपयांमध्ये आहेत.  आपले शंभर रुपये म्हणजे नेपाळी एकशेसाठ रुपये.

नेपाळी पारंपरिक जेवणाला खाना सेट म्हणतात
दुपारच्या प्रवासात जेवण ठीकसं झालंच नव्हतं.  आता भरपेट जेऊन घेतले.

उद्या सकाळी लवकर उठून चंद्रगिरी हिल ह्या ठिकाणी भेट द्यायचा बेत होता.

No comments:

Post a Comment