Wednesday, May 9, 2018

नेपाळ सफर - दिवस पाचवा - पोखरा

शुक्रवार १३ एप्रिल २०१८

माझा आजचा दिवस सुरु झाला पावणेपाच वाजता.  आज अन्नपूर्णा शिखरांवर उजाडणारा सूर्योदय पाहायचा बेत होता.  काल संध्याकाळी आणि रात्री भरपूर पाऊस पडला.  जर पाऊस चालू असला तर सूर्योदय पाहायला जायचे नाही, त्याऐवजी सिटी टूरला जायचे असे लेक ब्रीझ हॉटेलच्या मालकाबरोबर ठरले होते.  आता पहाटे पाऊस पूर्णपणे थांबला होता.  अन्नपूर्णा शिखरांवर होणार सूर्योदय पाहण्याचा योग आज माझ्यासाठी होता तर.

ठरल्या वेळेला म्हणजे सव्वापाच वाजता सारंगकोटला जायला निघालो.  Hyundai i10 गाडी होती.  सारंगकोटला जायला पंचवीस मिनिटे लागली.  पन्नास नेपाळी रुपये एन्ट्री तिकीट दिले.  सारंगकोट हा पोखरा समोरचा एक डोंगर आहे.  म्हणजे सारंगकोट ह्या नावाचे गाव ह्या डोंगरावर आहे.  ड्रायवरने एका ठिकाणी गाडी थांबवली.  इथून पुढे पायऱ्यांनी जायला सांगितले.  सूर्योदय व्हायला काही मिनिटंच बाकी होती.  मी एकदम वेळेत पोहोचलो होतो.

पायऱ्यांची वाट घेण्याआधी गाडीचा एक फोटो काढला.  नंतर गाड्यांची गर्दी झाली तर आपली गाडी शोधायला उपयोगी पडतो.
पायऱ्यांच्या वाटेने पळत वर निघालो.  समोर दिसणारं दृश्य शब्दात वर्णन कारण्यापलीकडचं होतं.  मोबाइलच्या कॅमेऱ्यात संपूर्ण दृश्य टीपणेही अशक्य होतं.  जमेल तसे प्रयत्न केले.  अजस्त्र पसरलेल्या हिमालयापुढे थोटुकभर मोबाइल तो काय.

अन्नपूर्णा पर्वतरांगेवर पडलेले सूर्याचे पहिले किरण
सूर्यदेव तसे रोजच येतात.  पण त्यांनी इथे हिमालयावर उधळलेली नजाकत इतर कुठेही न सापडणारी.  भन्नाट वगैरे असले सगळे शब्द तोकडे पडलेले.  कशासाठी लोक तडमडत हिमालयात ट्रेकिंगला जातात ते आज इथे समजलं.

जागोजागी पर्यटक मोक्याच्या जागी बसलेले.  पायऱ्यांच्या वाटेने वर पळत राहिलो.  मध्ये मध्ये थांबून फोटोग्राफी.

सूर्योदयाआधीचे काही क्षण
सहा वाजता सूर्योदय झाला.  मी वर वर जातच राहिलो.  आता पायऱ्यांची जागा रस्त्याने घेतली होती.  सव्वा सहाच्या सुमारास डोंगरावरच्या सर्वात उंच ठिकाणी पोहोचलो.

दूरवर अन्नपूर्णा पर्वतरांग आणि समोर खाली पोखरा शहर
माछापुच्छे (फिशटेल) पर्वतावरून आकाशात दूरपर्यंत निघालेला बर्फाचा धूर ...  शब्दात वर्णन कारण्यापलीकडचा.

सर्वात वरच्या ठिकाणाहून
मी खाली जायला निघालो तरी अजूनही पर्यटक वर येतच होते.  आता गाडीपर्यंत उतरून जाताना पायऱ्यांच्या वाटेने न जाता रस्त्याने निघालो.  काहीजण पळत वर येत होते.  सारंगकोटचा डोंगर पळत वर यायचं म्हणजे सातारा अर्धमॅरेथॉनच होईल.

गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून ड्रायवर थांबला होता.  पावणेआठला आम्ही हॉटेलवर परतलेले होतो.  मनात एकच विचार - आज जर इथे गेलो नसतो तर हा अमूल्य ठेवा गवसला नसता.

द कोस्ट हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर ब्रेकफास्ट होता.

द कोस्ट हॉटेल मधला ब्रेकफास्ट
भरपेट ब्रेकफास्ट करून घेतला.  मग फेवा लेक कडे निघालो.  लेक च्या कडेने रस्ता जिथपर्यंत जातोय तिथपर्यंत फेरी मारायचा विचार सुचला.  एका ठिकाणी दोन मुलं काठावरच्या भिंतीवर मजेत बसली होती.

ना कसली धावपळ ना उद्याची चिंता
रस्ता लेक ची बाजू सोडून डोंगरावर जायला लागला तिथून परत फिरलो.  चांगली तासाभराची रपेट झाली.  हॉटेलवर परत येईपर्यंत दहा वाजले.  मी हॉटेलची रूम सोडून बॅगा घेऊन निघालो, आजचा मुक्काम हॉटेल सेंटर लेक.  पोखरा मधल्या तीन दिवसात मी दररोज नवीन हॉटेलमध्ये राहिलो.  जिथे चांगली डील मिळेल तिथे जायचे.

द कोस्ट हॉटेलच्या रिसेप्शन वरच्या मुलाबरोबर बोलताना एक नवीन कल्पना सुचली.  सायकल (म्हणजे माउंटन बाईक) भाड्याने घेऊन फिरायचे.  हा मुलगा सायकलिंग मध्ये तरबेज होता.  त्याने त्याच्या मोबाइल मधले त्याच्या सायकलिंग ट्रिप्सचे अनेक फोटो दाखवले.  सायकल भाड्याने मिळण्याचे एक जवळचे दुकानही सांगितले.  आता मी बॅगा घेऊन द कोस्ट हॉटेल सोडून हॉटेल सेंटर लेकच्या दिशेने निघालो.  त्याने सांगितलेले दुकान दिसल्यावर त्या दुकानात शिरलो.  दुकानातल्या मुलांना द कोस्ट हॉटेलवाल्या त्यांच्या मित्राची ओळख सांगून एक सायकल ठरवली.  तीन तासाचे चारशे नेपाळी रुपये.  म्हणजे आपले दोनशे पन्नास.

हॉटेल सेंटर लेक ला जाऊन रूम घेऊन परत येईपर्यंत साडेबारा झाले होते.  द कोस्ट हॉटेल पासून हॉटेल सेंटर लेक बरेच लांब होते.  त्यात परत जड बॅगा घेऊन चालणं.  सायकल दुकानातल्या मुलांनी मला ठरवलेली सायकल दुसऱ्या कोणाला तरी दिलेली होती.  मग दुसरी एक सायकल बघितली.  तीन तासात कुठपर्यंत जाऊन येत येईल ह्याची चौकशी सायकल दुकानातल्या मुलांबरोबर केली.  ह्या लेक साईड रस्त्याने सरळ जात पामे गावापर्यंत जाऊन परत यायचे ठरवले.

गियरची सायकल मी पहिल्यांदाच चालवत होतो.  पुण्यातलं बेसुमार ट्रॅफिक बघता सायकल विकत घ्यायची इच्छा काही होत नाही.

दुपारची वेळ असूनही ऊन असे नव्हतेच.  लेक साईड रस्त्याला वर्दळही फारशी नव्हती.

पोखरा ते पामे सायकल राईड

जसजसा पुढे गेलो तसतसे रस्त्यात खड्डे वाढायला लागले.  फेवा लेकच्या पलीकडच्या बाजूला पोहोचल्यावर तिथल्या सपाट भागात एकापाठोपाठ एक पॅराग्लायडर्स उतरत होते.  हे सगळे सारंगकोटहून उडत होते.  इथे एक मोठा ब्रेक झाला.

फेवा लेकच्या बाजूच्या सपाट भागात उतरणारे पॅराग्लायडर्स
पुढे गेल्यावर डांबरी रस्ता संपून दगड धोंड्याचा ओबड धोबड रस्ता.  तासाभरात पामे गावात पोहोचलो.  पर्यटनाच्या क्षेत्रात आकंठ बुडालेल्या लेक साईड रोडपेक्षा हा भाग पूर्णपणे वेगळा होता.  थोडं पुढे जाऊन यायचं ठरवलं.

पामे गावचा फलक
आता रस्त्याच्या एका बाजूला उंच उंच झाडं.  दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेली गवताळ कुरणं.  अधे मधे गाई गुरं चरत होती.  कुरणांपलीकडे दूरवर घनदाट झाडांनी भरलेले डोंगर.

कास्कीकोट भागातलं निसर्गरम्य दृश्य

थोड्या वेळाने रस्ता डोंगराळ भागातून जाऊ लागला.  आणखी पुढे गेल्यावर वंसकोट असा फलक आला.  इथून परतीचा प्रवास सुरु केला.

गुगल मॅप मधून बघितलेली माझी सायकल राईड
पण गुगल मॅप ला समजत नाहीये कि इथे सायकल चालवता येते.  कार आणि चालत असे दोनच पर्याय दाखवतंय गुगल मॅप
पामे गावात फ्राय फिश चांगले मिळतात असे सायकलच्या दुकानातल्या मुलाने सांगितले होते.  थोडी भूकही लागली होती.  पामे गाव आल्यावर एका घराशेजारी सायकल थांबवली.  इथे विचारणा केली.  आज मोठे मासे नाहीयेत, छोटे मासे मिळतील असे सांगण्यात आले.  घरासमोर टेबलं टाकली होती तिथे थांबलो.  मग इथल्या बाईंनी समोरच्या दुकानातून तेल वगैरे साहित्य विकत घेतले.  फ्राय फिश बनेपर्यंत माझा आराम आणि आजूबाजूला फेरफटका झाला.  थोडी फोटोग्राफी झाली.

फोटोग्राफीचा एक प्रयत्न
फ्राय फिश अख्खेच खायचे होते.  तळल्यामुळे कुरकुरीत झाले होते.  नदीचे मासे तसे मला आवडत नाहीत.  पण हे चवदार होते.

पामे गावात मिळालेले फ्राय फिश
बाईंनी नेपाळी तीनशे रुपये बिल सांगितलं.  म्हणजे आपले एकशे नव्वद रुपये.

पोट भरल्यावर ताजातवाना होऊन निघालो.  मला सायकल घेऊन दोन तास झाले होते.  तीन तासात परत जायचा माझा विचार होता.

मधेच कुठेतरी सायकलच्या सीटची दिशा बदलली.  कधी आणि कशी ते मला कळले नाही.  आता हे सीट फार त्रासदायक झालं.  त्यात रस्ता म्हणजे दगड धोंड्यातून वाट मिळेल तिथून जायचं.  सायकलच्या दुकानापाशी पोहोचलो तेव्हा मी सायकल घेऊन बरोबर तीन तास झाले होते.  माझं तीन तासाचं टार्गेट पूर्ण झालं होतं.  इथे येईपर्यंत ढुंगणाचे इतके हाल झाले कि नवीन ढुंगण बसवून घ्यावंसं वाटत होतं.

सायकल (माउंटन बाईक) तीन तासासाठी भाड्याने घेतली ते दुकान
मी सायकल परत दिली आणि थोड्या वेळात पाऊस सुरु झाला.  पोखरामधे रोज संध्याकाळी पाऊस पडतो.  सायकल परत केल्यावर रमत गमत हॉटेलवर निघालो.  पोखरामधे आलो त्या दिवशी दुपारी मला एका दुकानात नेपाळी नॅशनल फुटबॉल टीमचं टीशर्ट दिसलं होतं.  तेव्हा मी गाडीत होतो.  त्यानंतर लेक साईड रोडच्या दुकानांमधे विचारत होतो ते टीशर्ट आहे का.  इथे ट्रेकिंगचं साहित्य मिळण्याची शेकडो दुकानं.  पण त्या सगळ्या दुकानात फुटबॉल टीमचं टीशर्ट नव्हतं.  आता एका कपडे विकणाऱ्या दुकानात ते टीशर्ट सापडलं.  नऊशे नेपाळी रुपये.  दुकानाच्या मालकाने काहीच किंमत कमी केली नाही.  मला टीशर्ट तर हवं होतं.  घेतलं मग.  नेपाळमधे सगळ्याच वस्तूंचं बार्गेनिंग चालतं.  वस्तू जाऊदे हॉटेलच्या रूमचं पण.

हॉटेलच्या मालकाबरोबर काठमांडूला जाण्याबद्दल चौकशी केली.  साध्या बसने जाण्यापेक्षा टुरिस्ट बसने जा असं त्याचं म्हणणं.  साधी बस थांबत थांबत जाऊन काठमांडूमधे रात्री पोहोचेल.  टुरिस्ट बस संध्याकाळी पोहोचेल, आणि जास्त आरामदायक असेल.  मला लमकी ते पोखरा साध्या बसमधून प्रवासाचा अनुभव मिळाला होताच.  आता काठमांडूला जाण्यासाठी उद्या सकाळी सातच्या टुरिस्ट बसचे तिकीट काढले.  टुरिस्ट बस ह्या हॉटेलपासून जवळच असलेल्या ठिकाणाहून सुटणार होती.  चालत पंधरा मिनिटांचे अंतर.

तासभर आराम करून बाहेर पडलो.  कालच्याप्रमाणे आजही लेक साईड रोडला लांबलचक फेरफटका आणि योग्य ठिकाण बघून जेवण. उद्या १४ एप्रिलला नेपाळी नवीन वर्षाचा पहिला दिवस.  त्यानिमित्त लेक साईड रोड वर काही कार्यक्रम असतात असं काहींच्या बोलण्यातून वाटलं होतं.  इथे बघतो तर कार्यक्रम वगैरे काही नाहीत.  आपल्याकडे ३१ डिसेंबरला संध्याकाळपासून रात्रीपर्यंत रस्त्यारस्त्यावर टाळकी बोंबलत फिरतात तशीच नेपाळी टाळकी फिरत होती.

उद्या सकाळी काठमांडूकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment